Boxer Girl |पुणे : जिद्द, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर खडतर परिस्थितीला ‘फाईट’ देते बॉक्सर लेकीनं देशात नाव काढले आहे. पुणे शहरातील ताडीवाला झोपडपट्टीत राहणाऱ्या चंद्रिकाने लहान वयात मोठ्यांना प्रेरणा मिळेल, असे काम केले आहे. चंद्रिका पुजारी असे दहावीत शिकणाऱ्या मुलीचे नाव आहे.
चंद्रिकाने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत ‘बेस्ट चॅलेंजर’ हा पुरस्कार पटकावला. त्याचबरोबर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल घेऊन इतिहास रचला. दहा बाय दहाच्या झोपडीत राहणाऱ्या चंद्रिकाने सिल्व्हर मेडलपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
चंद्रिकाचे वडील ऑफिस बॉय म्हणून काम करतात. तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करते. तिला लहानपणापासूनच बॉक्सिंगचे आकर्षण होते. त्यामधूनच चंद्रिकानं 2019 साली ‘युवा विकास मंच बॉक्सिंग अकादमी’ जॉईन केली. या अकादमीमध्ये तिनं कमी कालावधीमध्ये स्वत:ची छाप पाडली.
चंद्रिकाच्या या यशात तिचे कोच जयंत शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी तिच्यातील गुण हेरले आणि तिला खडतर प्रशिक्षण दिलं. बॉक्सिंगची आवड असल्यानं तिला हे प्रशिक्षण फारसं जड गेलं नाही. 2021 साली तिची गोव्यातील स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यावेळी या स्पर्धेत खेळण्यात घरच्यांचा विरोध होता. पण, शिंदे सरांनी समजावल्यानंतर घरच्यांनी परवानगी दिली, अशी आठवण चंद्रिकाने सांगितली.
देशातील क्रीडापटूंना प्रशिक्षण देणाऱ्या ‘साई’ या संस्थेत चंद्रिका आता बॉक्सिंगचे पुढील धडे गिरवत आहे. देशाला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देण्याचं तिचं ध्येय आहे. ‘चंद्रिकाला बॉक्सिंगचा ध्यास आहे. घरी आल्यानंतरही ती स्वस्थ बसत नाही. मुलीला बॉक्सिंग शिकावावं का? ती बॉक्सिंग शिकून काय करणार ? असा आम्हाला प्रश्न होता. पण, आम्ही सर्वांनी विचार करुन तिला हा खेळ शिकवण्याचं धाडस केलं. तिची यामधील प्रगती पाहून आनंद होतोय. अशी भावना चंद्रिकाचे वडिल ऋषी पुजारी यांनी व्यक्त केलीय. तर चंद्रिकानं आपल्या परिसराचं आणि घराचं नाव उंचावले असल्याचे तिच्या मावशीनं सांगितलं.
बॉक्सिंगचे रिंगण असो की आयुष्याचे मैदान खिलाडू वृत्ती असेल तर कुठल्याही परिस्थितीशी लढत देऊन विजयाचे उत्तुंग शिखर गाठता येते हेच चंद्रिका पुजारीने दाखवून दिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
IPL 2023 : यजुवेंद्र चहल बनला आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज ; ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम
Passport : पुणेकरांचा त्रास वाचणार ; पासपोर्टसाठी दैनंदिन अपॉइंटमेंटमध्ये वाढ