पुणे : परीक्षेच्या अभ्यासात असल्याने प्रियकराला काही दिवस भेटता आले नाही. ती फोनवर बोलणे देखील टाळत होती. तेव्हा प्रियकराने फोनवर त्याच्याकडील अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. रविवारी (दि. ९) या प्रियकराने पुण्यात येऊन तरुणीला शिवीगाळ करत जबरदस्तीने थार गाडीत बसवले. त्यानंतर तिचे अपहरण करुन तो तिला चाकणच्या दिशेने घेऊन गेला. यावेळी वाटेत तिला मारहाण करुन जखमी देखील केले. तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी हडपसर पोलिसांनी या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
प्रज्वल कैलास मोहिते (वय २७, रा. मोहितेवाडी, शेल पिंपळगाव, चाकण) असे या प्रियकराचे नाव आहे. याबाबत एका २६ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि. ९) दुपारी दीड वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही मूळची नाशिक येथील आहे. ती पुण्यात त्या शिक्षणासाठी आली असून सध्या मांजरी येथे भाड्याने राहत आहे. आरोपी प्रज्वल मोहिते याच्याशी २०२१ पासून ओळख असून तिचे प्रेमसंबंध आहेत. प्रज्वल हा व्यवसाय करतो. परिक्षा जवळ आल्याने फिर्यादी तरुणी अभ्यास करत असते. त्यामुळे तिचे प्रज्वल याच्याशी भेटणे झाले नाही़. तसेच ती फोनवर बोलणे टाळत होती. दरम्यानच्या काळात आरोपी प्रज्वल हा तिला फोनवर त्याच्याकडे असलेले फिर्यादी हिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. रविवारी तो थेट फिर्यादी राहत असलेल्या घरी आला आणि तिच्याशी भांडण करु लागला.
यावेळी तरुणीचे केस ओढून हाताने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन जबरदस्तीने थार गाडीत चालकाजवळ बसवले. त्यानंतर चालकाला चाकणच्या दिशेने गाडी घेण्यास लावली. यादरम्यान आरोपीने चालकाच्या शिटजवळ तुटलेल्या अवस्थेत असलेल्या टोकदार प्लॅस्टिक पट्टीने या तरुणीला खांद्यावर, हातावर, मनगटावर, दोन्ही पायांच्या पोटरीवर मांडीवर मारहाण करुन जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांचेही भांडण मिटले. तेव्हा आरोपी प्रज्वल मोहिते याने तरुणीला चाकण येथील श्वास रुग्णालयात घेऊन जात तिच्यावर उपचार केले. रात्री उशिरा पुण्यात आल्यावर संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने प्रज्वल मोहिते याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गेंड तपास करीत आहेत.