राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : बैलपोळा सणानिमित्त बैलांना सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याच्या विक्रीसाठी यवत येथील बाजारपेठ सजली आहे. परंतु बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी यंदा तुलनेने कमी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यवत येथील आजच्या आठवडे बाजारात अनेक व्यापाऱ्यांनी रात्रीच बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटली आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत बैलपोळा सण उद्या साजरा होत असल्यामुळे आज खरेदीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतील, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत होते. परंतु वाढत्या महागाईमुळे सणावर दुष्काळाचे सावट पसरले असून, सजावटीच्या साहित्यासाठी मागणी कमी असल्याचे चित्र आज सकाळी यवत बाजारपेठेत पहावयास मिळाले. विक्रीला पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकरी आणि मजूरवर्गाच्या हातात पैसा नाही
बैलपोळा सणानिमित्त जनावरांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याच्या विक्रीसाठी दुकाने सजल्याचे दृश्य यवत बाजारपेठेत पहायला मिळाले. (Yavat News ) यामध्ये यांत्रिक बैल, गायी, म्हशी, कालवडी, शेळ्या-मेंढ्यांच्या सजावटीसाठी लागणारे शेल, दृष्टमाळ, घुंगरमाळ, बाशिंग, गोंडे, वेसण, म्होरक्या, कवडीमाळ, मनिमाळ, चाबूक, शेंबी, रंगीत बेगडे, हिंगूळ (रंग), कासरा आदी साहित्य खरेदीस शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सुरुवात केल्याचे दिसून आले.
बैलांनी वर्षभर शेतात केलेल्या काबाडकष्टाची उतराई म्हणून शेतकरी वर्ग परंपरेनुसार बैलपोळा सण साजरा करतो. अलिकडच्या काळात बैलांची संख्या कमी झालेली असली, तरी शेतकऱ्यांचा बैलपोळा सणाचा उत्साह मात्र टिकून आहे, असे येथील प्रगतशील शेतकरी बबन दोरगे, छबन कुदळे, अशोक गायकवाड, विक्रम दोरगे, विजय दोरगे, सुनील खुटवड यांनी सांगितले.
बैलपोळ्यावर दुष्काळ व महागाईचे सावट
यंदा समाधानकारक पाऊस पडला नसल्याने बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. त्यातच महागाईने शेतकरी वर्गामध्ये काहीसा निरुत्साह दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा होणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Yavat News ) यंदा शेतकरी पावसाअभावी चिंतेत आहेत. दौंड तालुक्यात अपवाद वगळता पावसाने दडी मारली आहे. बागायती पिके वगळता अन्य पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. पोळा उंबरठ्यावर आला असला, तरी शेतकरी आणि मजूरवर्गाच्या हातात पैसा नाही, त्यामुळे पोळा यावर्षी जेमतेमच साजरा होण्याची शक्यता आहे. महागाईमुळे वर्दळीच्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात सजल्या असल्या, तरी म्हणावी तशी ग्राहकांची गर्दी होत नसल्याने व्यापारी वर्गात निराशा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : जलपर्णी समस्या व अतिरिक्त पाणी वापराबाबत सकारात्मक चर्चा; आमदार राहुल कुल यांची माहिती
Yavat News : फुलांच्या पायघड्या अन् स्वागत गीताने पाटस येथे ज्येष्ठांचे अनोखे स्वागत