-बापू मुळीक
सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थिनींचे कन्या पूजन करण्यात आले.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बाल विकास मंदिर शाळेत विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. यात, विजया गायकवाड (शिक्षिका), विशाखा जगताप (फार्मसिस्ट), डॉ. माधुरी जगताप (डॉक्टर), सरिता पाटील (इंजिनिअर) , तेजस्विनी जगदाळे (आर्टीस्ट), प्राजक्ता कुदळे (परिचारिका), धनश्री लोमटे (कथ्थक शिक्षिका ), मंजुषा चोरामले ( शिक्षिका), स्वरा इनामके (राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन खेळाडू ) , या सर्व नवदुर्गांचे इ. तीसरीतील विद्यार्थिनींनी पूजन करून भेटवस्तू दिल्या. नवरात्रोत्सवात कन्या पूजनाला महत्त्व लक्षात घेता शाळेत कन्यापूजन करण्यात आले. यासाठी विद्यार्थिनीच्या माता पालकांना शाळेत आमंत्रित करण्यात आले होते. माता पालकांनी आपल्या कन्येचे पाद्यपूजन करून त्यांना भेटवस्तू दिल्या.
यावेळी, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कन्या पूजनाचे महत्त्व विशद केले, तसेच 3 वर्ष ते 10 वर्ष वयाच्या कुमारीकांना देण्यात आलेली देवीची विविध रूपे याविषयी सांगितले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात शाळेत नवदुर्गा व कन्यापूजनाचा कार्यक्रम पार पडला.
उपस्थित नवदुर्गांचा परिचय शीतल चौधरी यांनी करून दिला. कन्यापूजन विषयी माहिती शाळेतील शिक्षिका अश्विनी कदम यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र महाजन यांनी केले. तर आभार माधुरी जगताप यांनी मानले.