पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथे मद्यधुंद अवस्थेत आलिशान कारच्या अल्पवयीन चालकाने युवक- युवतीला चिरडले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचे नाव पुढे आले आहे. या अपघाताप्रकरणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवर अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचा दबाव होता असा आरोप केला जात आहे. अशातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीन प्रश्न विचारले आहेत.
काय म्हणाले अंबादास दानवे?
आमदार सुनील टिंगरे सांगतात की, त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला नाही. खरंतर हा शेंगा खाऊन टरफल लपवण्याचा प्रकार आहे. तुमचा दबाव नव्हता असं तुम्ही म्हणत असाल तर माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या.
१. तुम्ही (आमदार सुनील टिंगरे) मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेला होतात?
२. एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी किती वेळा असे मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचला आहात?
३. अनेकदा अशा प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते, मात्र तुम्ही थेट पोलीस ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेला होतात? असं म्हणत दानवे यांनी अजित पवार यांच्याकडे बोट केलं. म्हणाले, खरंतर या प्रश्नांची उत्तरं अजित पवार यांनी द्यायला हवीत.
आमदार @suniltingre सांगतात की मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे!
याचे उत्तर द्या मग..
१. गेले का होतात तुम्ही पोलिस ठाण्यात मध्यरात्री?
२. एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी कितीवेळा असे मध्यरात्री पोलिस ठाण्यात पोचला आहात?
३. प्रकरणाची माहिती फोनवर…— Ambadas Danve (@iambadasdanve) May 22, 2024
काय म्हणाले सुनील टिंगरे?
कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी मी आशा बाळगतो.
या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना समाजमाध्यमांवर काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत केली जात आहे. मी सुरवातीला याकडे दुर्लक्ष केले. मात्र, विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मला माझी भूमिका मांडणे आवश्यक आहे.
माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती मला १९ मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यापाठोपाठ माझ्या परिचितांनी मला फोन केला. त्यांच्या मुलाचा अपघात झाल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो, असे सुनील टिंगरे म्हणाले होते.