केडगाव: गेली तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. कधी पाऊस पडेल याचा नेम नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
मागील काही दिवसांपासून दर दोन दिवसाला वातावरणात बदल होत आहे. कधी उष्णता वाढते, तर कधी थंड वारे वाहते. अधूनमधून पावसाच्या सरीदेखील कोसळत आहेत. यामुळे हातातोंडाशी आलेला गहू, हरभरा तसेच इतर तरकरी पिकाचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या आठवड्यात झालेल्या वातावरण बदलाचा अनेक शेतकऱ्यांच्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.
दरम्यान, सकाळपासूनच ढगाळ वातावरण होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गव्हाच्या कापणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी मळणी यंत्राच्या मागे हेलपाटे मारताना पाहायला मिळत असून वातावरणातील अचानक बदलामुळे मळणी यंत्राचीही मागणी वाढली आहे. तसेच अचानक कधी पाऊस पडेल याचा अंदाज नसल्याने गहू झाकण्यासाठी पाणकापड खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
सध्या अनेक शेतकऱ्यांचा गहू काढणीस आला आहे. परंतु, मळणी यंत्र काही मिळत नाही. तसेच अचानक सुटणाऱ्या वाऱ्यामुळे गहू हे पीक खाली पडत असल्याने मळणी यंत्रातून या गव्हाची काढणी करता येत नाही. तसेच बहुतांश शेतकऱ्यांचा गहू शेतातच उभा आहे. या वर्षी दिवाळीवेळी झालेल्या परतीच्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बीच्या क्षेत्रात वाढ केली होती. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकास पसंती दिली आहे . परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. तसेच या वर्षी रब्बी हंगामात गहू व हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. पण हातातोंडाशी आलेला घास बदलत्या वातावरणामुळे हिरवण्याची शक्यता वाढली आहे.