पुणे : पुणे शहरातील काँग्रेस भवनमध्ये शनिवारी दुपारी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ काँग्रेस (एनएसयूआय) या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल्ल पिसाळ (रा. कोथरूड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिसांत तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, भूषण रानभरे आणि युवराज नायडू यांच्यावर भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते शनिवारी ३ फेब्रुवारीला काँग्रेस भवन येथे जमले होते. एनएसयूआयच्या शहराध्यक्षपदावरून गेले काही महिने वाद सुरु होते. शनिवारी हा वाद थेट भांडणामध्ये रूपांतरित झाला. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख तसेच भूषण रानभरे आणि अन्य कार्यकर्ते सभासद नोंदणीचे काम करत होते. तिथे अचानक काही कार्यकर्ते आले.
त्यांच्यात आणि आधी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. शहराध्यक्षपदावरून तसेच सदस्य करण्याचे अधिकार कोणाला, यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या कारणावरूनच विद्यार्थी प्रदेशाध्यक्षांकडून विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाला काँग्रेसभवनामध्येच विटेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहे.