हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक व जुना एलाईट चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यासाठी नियमांचे उल्लंघन, वाहनांची वाढती संख्या, विकासकामे, वाहतूक पोलिसांची कमतरता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारी वाहतूक कोंडी यांसारखी अनेक कारणे आहेत. ही समस्या सर्वसामान्यांशी निगडित असल्याने याबाबत लोकप्रतिनिधी, पोलिस, वाहतूक शाखेचे कर्मचारी व संबंधित ग्रामपंचायतीने नियोजन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर येथील मांजरी फाटा (१५ नंबर) ते उरुळी कांचनदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. परिणामी, महामार्गावरील मुख्य चौकांमध्ये प्रचंड कोंडी होते. तसेच रस्त्याच्या कडेलाच विविध विक्रेते बसतात, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अपघात टाळण्यासाठी व गावांतील नागरिक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस उपायुक्त विजय कुमार याकडे आता तरी लक्ष देणार का? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे.
हडपसर पाठोपाठ हवेली तालुक्यातील या भागांमध्ये विविध आस्थापने, खासगी कंपन्या, सुसज्ज दवाखाने, मोठी दुकाने, शोरूम, मॉल व शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली आहे. शहराच्या लगतचा भाग असल्याने येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीनुसार शेवाळवाडी पर्यंतचा भाग पालिकेत समाविष्ट केला आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी तसेच जेजुरी, सासवड येथे जाण्यासाठी पुणे शहर व परिसरातील अनेक भागांतील नागरिक उरुळी कांचन येथील या रस्त्याचा वापर करीत आहेत.
उरुळी कांचन गाव हे महामार्गाच्या दोन्ही बाजूला पसरले असल्याने दिवसभर विविध कारणांसाठी रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच तरडे येथे ऑईल डेपो असून, यामध्ये जाणाऱ्या आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या गाड्यांची वर्दळ दिवसभर याच रस्त्यावरून सुरू असते. वाहतूक करणाऱ्या गाड्या आकाराने मोठ्या असल्याने मुख्य रस्त्यावर होणाऱ्या कोंडीत भर पडते. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा धोका संभवत आहे. उरुळी कांचन ही गावे ‘शैक्षणिक हब’ म्हणून विकसित झाल्याने येथे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या परिसरामध्ये हॉटेल्स, विविध दुकाने, मंगल कार्यालये अधिक असल्याने लग्नसराईच्या काळात वाहतूक कोंडी होते.
तळवाडी चौकात पोलीस असले तरीही वाहतूक कोंडी कायमचीच..
तळवाडी चौकात दिवसभर दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह चार पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कायम तत्पर असतात. मात्र, महार्गाच्या एका लेनवर चारचाकी गाड्या लावून काही वाहनचालक तासनतास हॉटेलमध्ये बसत आहेत. त्यांना या वाहतूक कोंडीशी काहीही घेणे देणे नाही. या चौकात रस्त्यातच बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. त्यामुळे पायी चालणेही जिवावर बेतू शकते. अशा वाहनांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोंडीची मुख्य कारणे..!
- चौकात पीएमपीएल बस थांबा असल्याने पीएमपीएल बसेस थांबण्यांसाठी मोठी जागा लागते.
- चौकातून होणारी रिक्षा वाहतूकही मोठ्या प्रमाणांवर असून रिक्षाचालकांची निश्चित जागा नाही.
- निश्चित जागा नसल्याने रिक्षा कोणत्याही ठिकाणी थांबतात.
- रस्त्याच्या दोन्ही बाजूला टपरीचालक, फळेविक्रेते यांनी अतिक्रमणे केल्याने वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
महामार्ग व शिंदवणे रोडच्या दोन्ही बाजूला रस्ता हा हातगाडी, दुचाकी, रिक्षा आदी वाहनांनी व्यापला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या एका बड्या रुग्णालयात रुग्णवाहिका घेऊन जाण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी असलेल्या हातगाड्या, दुचाकी, रिक्षा यांच्यावर कारवाई पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.
रिक्षांची व सहाआसनी रिक्षांची संख्या वाढली..
महामार्गावर रिक्षाचालक व काही खाजगी वाहने घेऊन जाणारे चालक यांनी थेट महामार्गावरच रिक्षा उभ्या करीत आहेत. या चालकांना पोलिसांचा वचक राहिला नसल्याने चालक थेट महामार्गावरच रिक्षा लावून निवांत फिरत आहेत. तसेच हडपसर, लोणी काळभोर, यवत, सासवड परिसरातून येणाऱ्या रिक्षांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रिक्षांचे थांबे किती आहेत, एका थांब्यावर किती रिक्षा याची माहिती जाहीर नसल्याने त्यावर सर्वस्वी रिक्षा चालकांचाच अधिकार असल्याची त्यांची भावना आहे. वास्तविक रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी ठोस उपायांची गरज आहे.