उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन व टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फुटक्या महादेव मंदीराजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई मंगळवारी (ता. २६) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अरविंद रामलाल राजपुत (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल संजय खांडेकर (वय २९) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकरवाडी गावचे हद्दीत उरुळी कांचन व टिळेकर वाडी गावचे ओड्याचे शिवेवर ओढ्यामध्ये फुटक्या महादेव मंदीराजवळ अरविंद राजपुत हा विषारी गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता ८०० लिटर कच्चे रसायन, बॅरलवरील अल्युमिनिअमचे झाकण, दारू तयार करण्याचे कच्चे व पक्के रसायन असा ५८ हजारांचा दारू तयार करताना मिळून आला.
दरम्यान, आरोपी अरविंद राजपूत हा पोलीसांची चाहुल लागताच पळून गेला असून, त्याच्याविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील करत आहेत.