उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनसह परिसरात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रविवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन गावच्या हद्दीतील दत्तवाडी परिसरातील संदीप सुभाश कांचन यांच्या राहत्या घराजवळ, आडोशाला ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी एका टेम्पोसह १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पोचा मालक समीर जयसिंग कांचन (रा. जय मल्हार रोड, उरूळी कांचन, ता. हवेली) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रमेश भोसले यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गुटख्याची वाहतूक करणारे वाहन थांबले असल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून टेम्पो ताब्यात घेतला.
या वेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यानुसार बेकायदा गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह सुमारे १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, टेम्पोमालक फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.