पिंपरी, (पुणे) : तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपये घेऊन त्याबदल्यात नकली नोटा देत फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. निगडीतील ट्रान्स्पोर्टनगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आकाश सत्यवान शेटे (वय ३०, रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव, पुणे), सचिन एकनाथ नरवडे (वय ३७, रा. सस्ते चौक, मोशी) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम भगवान सोनवणे (रा. भागेश्वर कॉलनी, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला फसविण्याच्या उद्देशाने त्यांचा विश्वास संपादन करून तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून दहा लाख रुपये घेतले. मात्र, त्या बदल्यात फिर्यादीला नकली नोटा देऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत मोठ्याने बोलतो म्हणून एकाने हातोड्याने मारहाण केल्याची घटना वडमुखवाडी येथे घडली. हरिदास रामेन मुजुमदार (वय ३२, रा. बालाजी मंदिराजवळ, वडमुखवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कमलकुमार ब्रीजाचंद्र दास (रा. लेबर कॅम्प, बालाजीनगर, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, फिर्यादी आणि विश्वजीत शहा त्यांच्या खोलीत जेवण करीत असताना मोठमोठ्याने बोलत होते. त्यावेळी बाजूच्या खोलीत राहणारा आरोपी हरिदास हा फिर्यादी यांच्या खोलीसमोर आला व एवढ्या जोरात कशाला ओरडता, असा म्हणाला. त्यावर विश्वजीत म्हणाला की, तू कशाला आम्हाला विचारतो. असे म्हणताच आरोपीने त्याच्या घरातून छोटी हातोडी आणून विश्वजित यांच्या डोक्यात मारून जखमी केले.