हडपसर (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. रोहितसिंग जितेंद्रसिंग टाक (वय १९), कमलेश नरेंद्र भोरे (वय २२, रा. दोघेही नवीन म्हाडा बिल्डींग नं १६, हिंगणमळा ससाणेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी देविदास काळे हे कामावरून घरी पायी चालत काळेपडळ परिसरातून निघाले होते. घरी जात असताना दोघे एका दुचाकीवर आले व त्यांनी त्यांच्याजवळ असलेली दुचाकी ही देविदास काळे यांच्याजवळ आणली. यावेळी आरोपींनी काळे यांना पैसे काढ असे म्हणून त्यांच्या शर्टाच्या खिशात हात घालून त्यांना पैशांची मागणी केली. काळे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये काळे यांच्या तोंडाला, डाव्या पायास मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी काळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दरम्यान, या घटनेचा हडपसर पोलीस तपास करत असताना त्यांना या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज व तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.
हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे हे करत आहेत.
ही कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांच्या पथकाने केली आहे.