उरुळी कांचन (पुणे) : घरातील सर्वजण नातेवाईकांच्या वर्षश्रद्धाला गेल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत अतिशय गजबजलेल्या आश्रमरोड परिसरातील सार्थपार्थ बिल्डींगमध्ये चौथ्या मजल्यावर शुक्रवारी (ता. 31) सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. भर सोसायटीत वर्दळ असलेल्या ठिकाणी चोरट्यांनी दिवसा बंद घराचा दरवाजा तोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नारायण श्रीधर कुंभार (वय – ६१, व्यवसाय –फँब्रीकेशन , रा. आश्रमरोड, उरुळी कांचन ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण कुंभार व त्यांचे कुटुंबीय उरुळी कांचन हद्दीत असलेल्या दत्तवाडी परिसरातील एका नातेवाईकांच्या वर्षश्रद्धाच्या कार्यक्रमाला घराला कुलूप लावून अकरा वाजण्याच्या सुमारास गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आले त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडलेल्या अवस्थेत आढळून आला.
यावरून त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. यावेळी कपाटाचे कुलूप खाली पडले होते. तसेच कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाही.
दरम्यान, इतर ठिकाणी ठेवलेले काही लहान मुलांचे सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. यावरून घरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.