पुणे: पुण्यातील पीएमपी बसेसमध्ये चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीत सातत्याने अशा घटना घडतांना दिसून येत आहेत. पीएमपी बसमधून कात्रजहून अरण्येश्वर चौकात जाणाऱ्या ५९ वर्षीय महिलेची ७५,००० रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरट्यांनी चोरून नेली. शनिवारी सकाळी बसमध्ये गर्दी असताना ही घटना घडली. महिलेने सहकार नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निगडीहून पुणे स्टेशनला पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या हँडबॅगमधून १,१७,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. ही घटना दुपारी घडली असून महिलेने बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्वारगेट पीएमपी बस स्थानकावर वाट पाहत असलेल्या ६६ वर्षीय महिलेची सोन्याची पाटली हिसकावल्याची घटना उघडकीस आले आहे. या प्रकरणी महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
स्वारगेट पीएमपी बस स्थानकावर वाट पाहत असलेल्या ६६ वर्षीय महिलेची ५०,००० रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरट्यांनी हिसकावून घेतली. ही घटना घरी जाण्यासाठी महिला बसमध्ये चढत असताना घडली. तिने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुणे पोलिस तिन्ही प्रकरणांचा तपास करत असून प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.