पुणे: पुण्यातील भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिकांना एका अज्ञात व्यक्तीचा मुंडक नसलेला मृतदेह शिरगाव गावाच्या हद्दीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. शिरगावच्या वरंध घाट परिसरात दुर्गम डोंगराळ भागात हातपाय बांधलेल्या अवस्थेत हा मुंडके नसलेला मृतदेह आढळला. परिसरात गुरे चरणाऱ्या व्यक्तींना दुर्गंधी येत असल्याने पाहिले असता हा मृतदेह आढळून आला, त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली आणि भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णा पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह अधिक तपासणीसाठी ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला होता. वरंधा घाटात मागील वर्षभरात मृतदेह आढळण्याचे सत्र थांबले होते. मात्र शुक्रवार दि.२५ रोजी पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.
पोलिसांनी जवळच्या गावांमध्ये चौकशी करत तपास केला. मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांना नियोजित खून असल्याचा संशय होता. विशेषतः वरंध घाट परिसर दुर्गम असल्याने येथे अशा घटना सातत्याने घडत असतात. कसून चौकशी केली असता मृतदेह ४० ते ४५ या वयोगटातील व्यक्तीचा असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस हत्येमागील गूढ उलगडण्याचे काम करत असतांना तपासात मयताचे नाव संतोष उर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर, (४०) असे असल्याचे निष्पन्न झाले असून जुन्या वादातून प्रमोद पासलकर यांचा खून करण्यात आल्याचे गुन्हेगारांनी कबूल केले आहे. याप्रकरणी संतोष भिकु पिसाळ (४२), अनिकेत चंद्रकांत पिसाळ, (२९) यांना अटक करण्यात आली आहे.