पुणे : एक दाम्पत्य म्हाडाकडून स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे आणि संबंधितांकडून लाखो रुपये उकळत असल्याचे समोर आले आहे. घर न मिळता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या दाम्पत्याविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यात आली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शंकर दिनकर कांबळे (वय 65, रा. मंगळवार पेठ, जुना बाजार) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी भगवान कांबळे आणि त्याची पत्नी रेखा ऊर्फ कलावती भगवान कांबळे (रा. न्यू म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
म्हाडामध्ये कामाला असल्याचे सांगायचे अन्…
भगवान आणि त्याची पत्नी रेखा हे दोघे आपण म्हाडामध्ये कामाला आहोत. पुनर्वसनामधील घर स्वस्तात मिळवून देतो, असे आमिष दाखवायचे. त्यानंतर या दोघांनी शंकर कांबळे यांना मोबाईलवर म्हाडाची घरे दाखवून विश्वास संपादन केला. घराच्या बुकिंगसाठी अगोदर 16 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार, कांबळे यांनी पैसेही दिले.
घराबाबत चौकशी केल्याने भांडाफोड झाला
फिर्यादी यांनी पैसे दिल्यानंतर घराबाबत चौकशी केली. त्यावेळी रेखा हिने तुम्हाला घर मिळणार नाही. इतकेच काय तर तिने स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकीही दिली. तर तिच्या पतीने गुंडामार्फत मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.