लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून कठड्यांना धडकून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. येथील सततच्या अपघातांमध्ये अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकांना गंभीर इजा झाल्याने अपंगत्व आले आहे. त्यामुळे येथील कठड्यावर पिवळा दिवा (ब्लिंकर्स) बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
उड्डाणपूलावर असलेले कठडे धोकादायक बनले असून रात्रीच्या वेळी हे कठडे दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहे. विशेषतः दुचाकी चालकांना समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांची लाईट चमकल्याने कठडे दिसत नाही, त्यामुळे बहुतांशी अपघात होत आहेत. त्यामुळे थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपूलावरील कठडा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.
अनेकदा स्वयंसेवी संस्था व राजकीय कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतून अपघातग्रस्त कठड्याला रेडीअम व छोटे छोटे रेडिअमचे पोल कठड्यावर लावले होते. यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना ते दिसत होते. मात्र काही महिन्यानतंरच ते गायब झाल्याने दुचाकीस्वारांचा प्रवास उड्डाणपूलावरुन सुरक्षित राहिलेला नाही.
थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडा हा अपघातांचा हॉट स्पॉट बनला असून त्यामुळे या उड्डाणपुलावर नेहमी किरकोळ व छोटे-मोठे अपघात होत आहेत. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने मोठा अपघात होण्यापूर्वीच हे कठडे हटवावे, अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांकडून होत आहे.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आजच थेऊरफाटा येथील उड्डाणपूलावरील धोकादायक कठड्याची पाहणी करतो. तसेच ब्लिंकर्स दिवे किती लागतील व ते कुठे बसवावे याबाबत माहिती घेतो. सुरक्षित प्रवासासाठी प्राधान्य असल्याने उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असंही घाडगे म्हणाले.