ओमकर भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या चॅम्पियन शुगरकेन इनफिल्डर अँड ट्रेलर कंपनीत चोरीची घटना घडली आहे. शॉपच्या शटरचे कुलूप तोडून शुगर केन इन्फिल्डर मशीन आणि इतर वस्तू चोरून नेल्या. यामध्ये तब्बल ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना १३ जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत बाबासाहेब दादासाहेब निमसे (वय-४९, रा. इको ग्राम सोसायटी, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून हरीश बाळासाहेब शिंदे (रा. बीड शहर) व त्याच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निमसे यांची सणसवाडीमध्ये ‘चॅम्पियन शुगर केन इन्फिल्डर अँड ट्रेलर’ या नावाने कंपनी आहे. या कंपनीत शुगर केन इन्फिल्डर आणि ट्रेलर तयार होतात. फिर्यादी निमसे यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी (१६ नोव्हेंबर २०२२) रोजी हरीश शिंदे या व्यक्तीने दोन शुगरकेन इन्फिल्डर मशीन बनवण्यास सांगितले होते.
या दोन्ही मशीनची किंमत २० लाख ६५ हजार रुपये (‘जीएसटी’सहित) इतकी होती. त्यापैकी हरीश शिंदे यांनी फिर्यादी निमसे यांना १७ लाख ५० हजार रुपये दिले व जीएसटी चे ३ लाख १५ हजार रुपये बाकी ठेवले. त्यावेळी हरीश शिंदे यांनी एक शुगरकेन इन्फिल्डर मशीन घेऊन गेले. फिर्यादी यांनी दुसरी शुगर केन इन्फिल्डर मशीन तयार झाली असून दोन्ही मशीनचे जीएसटी बिल ३ लाख १५ हजार रुपये भरा असे आरोपी शिंदे यांना सांगितले.
त्यानंतर १५ डिसेंबर २०२२ रोजी हरीश शिंदे हा फिर्यादी निमसे यांच्या कंपनीमध्ये येऊन म्हणाला की, मी जीएसटीचे बिल भरणार नाही, सदर मशीन हे शेती उपयुक्त असून जीएसटी लागत नाही. मला माझे शुगर केन इन्फिल्डर मशीन द्या, असे म्हणत वाद करून निघून गेला.
दरम्यान, १३ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निमसे यांच्या कंपनीचे कुलूप तोडून हरीश शिंदे आणि तीन अनोळखी व्यक्तीने जॉन डीअर ट्रॅक्टर तसेच शुगरकेन इन्फिल्डर मशीन व इतर साहित्य असा एकूण ३७ लाख ६४ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.