लोणी काळभोर, ता. २० : पोलिस म्हटलं की, कडक, शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व अशीच ओळख आपल्याला माहीत असते. मात्र, पोलिसाच्या वर्दीतही अनेक कलाकार दडलेले असतात, ज्याची प्रचिती क्वचितचं पाहायला मिळते. सध्या वर्दीतल्या एका अवलियाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
सामाजिक एकोपा जपण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष होले यांनी ‘बाई माझ्या दुधात नाही पाणी’ ही गवळण गायली आहे. संतोष होले यांना लहानपणापासूनच गायनाची व नृत्य करण्याची आवड आहे. त्यांनी गायनाचं कुठलंच विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. परंतु, गणपती बाप्पासमोर भजन करताना गायलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या जादुई आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. व्हिडिओमधील पोलिसाच्या आवाजाचे परिसरात तोंडभरुन कौतुक केले जात आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी रात्रपाळीला होले हे कर्तव्य बजावत होते. पोलीस ठाण्यात असलेल्या चार कर्मचाऱ्यांनी मिळून गणपतीपुढे आपापली कला सादर केली. सध्या होले यांनी गायलेल्या गवळीणीची चर्चा होत आहे.
लहानपापासूनच गायनाची विशेष आवड..
संतोष होले हे गेल्या २३ वर्षांपासून पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. सामाजिक एकोपा जपण्यासाठी त्यांनी पोलिसाचा गणवेश घालून (वर्दी) हे गीत गायले आहे. संतोष यांना लहान असल्यापासूनच गायनाची विशेष आवड होती. परंतु, नोकरी पोलीस दलात असल्याने ते यापासून दुरावले. मात्र, जेव्हा त्यांना वेळ मिळतो त्या वेळेत ते आपला गायनाचा छंद पूर्ण करतात.
गाण्याला चांगला प्रतिसाद..
संतोष होले यांनी गणपतीनिमित्त गवळण सादर करून समाजात गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश दिल्याचं समाधान व्यक्त केले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यातील बऱ्याच नागरिकांनी होले यांच्या आवाजाचे कौतुक केले आहे.