न्हावरे,ता.०४: न्हावरे फाटा ते करडे रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून, रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष मुदत ५ जानेवारी रोजी संपली तरीही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. तसेच लहान-मोठे अपघात होऊन वाहन चालक, प्रवाशी यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापत्य विभागाच्या अधिकारी व कंत्राटदार यांना वाहन चालक व प्रवाशी यांच्या जीवाशी खेळण्याचा काहीही अधिकार नाही.अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया वाहन चालक व प्रवाशांनी रस्त्यावर थांबून व्यक्त केल्या आहेत.
गुरुवारी (ता.०३) सायंकाळी जोरदार वाऱ्यासह काही वेळ पाऊस झाला. त्यावेळी संबंधित कंत्राटदाराने डिव्हायडरच्या कामासाठी रस्त्याच्या मधोमध वरचेवर उभा केलेला लोखंडी सळायांचा सांगाडा वाऱ्याने उडून दुचाकी व चारचाकी गाड्यांवर आदळल्यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर पडून जखमी झाले तर चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
न्हावरे फाटा ते करडे रस्त्याच्या दुर्दशेसाठी पूर्णतः कंत्राटदार व संबंधित अधिकारीच जबाबदार असून,या रस्त्याच्या कामादरम्यान जेवढे अपघात झाले त्या अपघातांना अधिकारी,कंत्राटदार यांना जबाबदार धरून,त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.