पुणे : ‘‘आतापर्यंत जे झाले ते झाले, आता आगीशी खेळू नका,’’ असा सज्जड दम देत रात्री-बेरात्री सुरू असणारे हॉटेल, पब आणि बार रात्री दीडला बंद म्हणजे बंद असतील, असा इशारा पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा आणि खराडी भागात याची मात्रा लागू झाली आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार या भागात रात्री दीड वाजण्यापूर्वीच हॉटेल, पब, बार, क्लब बंद करण्यात येत आहेत.
‘नाईट लाईफ’च्या नावाखाली रात्री-बेरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेल, पब आणि बारमध्ये पहाटेपर्यंत मद्यविक्री सुरू असते. अनेक पबमध्ये सरकारी नियमांचे उल्लंघन केले जाते. स्पीकरवर जोरजोरात गाणी वाजवली जातात. त्याचा स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. त्यामुळे शहरातील सर्व ‘पब-बार’ रात्री दीड म्हणजे दीड वाजता बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शासनाने ठरवून दिलेली वेळ पाळण्यात यावी. अन्यथा कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी बजावले आहे. आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याला चार दिवसही उलटले आहेत. याचा योग्य तो परिणाम कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा आणि खराडी भागात दिसून आला. तर बाणेर, बालेवाडी भागात पब आणि बार रात्री दीडनंतरही सुरू असल्याचे आढळले.
शहराच्या काही भागांमध्ये पोलिसांनी अचानक छापे घातले. त्यामुळे बारचालकांची तारांबळ उडाली. गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्यांना आणि मस्त रंगात आलेल्या मद्यपींना बाहेर जाण्यास कसे सांगावे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे प्रत्येक टेबलवर जाऊन ग्राहकांना विनंती करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
वेळेआधीच हॉटेल बंद
पुणे विभागाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, पोलीस विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरु असेलेल्या हॉटेल, पब आणि क्लबवर नजर ठेवण्यासाठी पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. पथकाच्या माध्यमातून हॉटेलचालकांना सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे वेळेआधीच हॉटेल बंद होत आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाकडूनदेखील हॉटेल्सवर नजर ठेवली जात आहे. कोणतेही हॉटेल रात्री दीडनंतर सुरु असल्याचे दिसून आले तर त्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशांचे पोलीस अधिकारी काटेकोर पालन करीत आहेत.