शिरूर(पुणे): पाबळ (ता. शिरूर) येथे कार्यरत असलेले गावकामगार तलाठी यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच करडे येथील शेतातील विहिरीत आढळून आला. पवन अशोक बांदल (वय 31, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
मृत पवन बांदल यांचे बंधू श्रीनिवास अशोक बांदल यांनी शिरूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढण्यात आला. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता पाय घसरून विहिरीत पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज त्यांच्या कुटूंबियांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बांदल हे पाबळ येथे गेल्या 7 महिन्यांपासून गावकामगार तलाठी म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दूचाकीवरून पाबळ येथे जाण्यास निघाले होते. त्यावेळी त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास यांनी, ‘जाताना शेतातील विहिरीवरील मोटार चालू करून जा’, असे सांगितले होते. तेंव्हा त्यांनी होकार देऊन ते निघून गेले होते.
दरम्यान, मयत पवन बांदल यांचे मोठे बंधु श्रीनिवास हे पावणेबारा वाजण्याच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी गेले. तेंव्हा शेतात पाणी आलेले नसल्याने ते मोटार चालू करण्यास विहीरीकडे गेले. तेव्हा विहिरीच्या कडेला पवन यांची दूचाकी उभी केलेली होती. तसेच या दूचाकीवर त्यांच्या लॅपटॉपची बॅगही ठेवली होती.
त्यानंतर श्रीनिवास यांना संशय आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीतील पाण्यावर पवन यांचा मृतदेह तरंगलेला दिसून आला. त्यांनी आरडाओरडा करून कुटूंबियांना आणि शेजाऱ्याऱ्यांना तेथे बोलावून पोलिसांना कळविले.
पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पवन बांदल यांचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढला. पवन याला पोहता येत नसल्याने व विहिरीतील मोटार चालू करताना त्याचा तोल गेला असावा आणि तो तो विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
पवन बांदल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ते तलाठी परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या ते पाबळ येथे गावकामगार तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवाजी भोते पुढील तपास करीत आहेत.