लोणी काळभोर, (पुणे) : ओव्हरटेक केल्याच्या रागातून टेम्पोचालकाने दुचाकीस्वाराला मारहाण करून कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) घडली. थेऊर ते केसनंद फाटा परिसरातील नदीच्या पुलावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भरदिवसा हा प्रकार घडल्याने लोणीकंद, वाघोली, मांजरी भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. काहींनी आपल्या मोबाईल फोनमध्ये व्हिडिओही काढला. या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यावेळी झालेली वाहतूक कोंडी दूर केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून सदरचा टेम्पो हा थेऊर फाटा परिसरातून वाघोलीकडे पालकाची भाजी काढण्यासाठी निघाला होता. या टेम्पोत पाठीमागील बाजूस ५ ते ६ महिला कामगार होत्या. रस्त्यावरून टेम्पो जात असताना या ठिकाणी असलेली पाठीमागील वाहनांना चालक हा दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांना पुढे जाऊ देत नसल्याचे उपस्थित असलेल्या वाहनचालकांनी सांगितले.
यावेळी एक दुचाकीस्वार हा टेम्पोच्या पुढे गेला, यावेळी याचा राग आल्याने टेम्पोचालकाने दुचाकीस्वाराला ओव्हरटेक केले व गाडी आडवी लावली. यावेळी चिडलेल्या टेम्पोचालकाने थेट भाजी कापण्याच्या कोयत्याने दुचाकीस्वारावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरून निघालेल्या वाहनचालकांनी हा थरार पाहण्यासाठी लोणीकंद, वाघोली, मांजरी भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तर काहींनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले होते.
कोयत्याने 10 ते 12 वार, दुचाकीस्वार जखमी
यावेळी टेम्पोत पाठीमागे बसलेल्या महिलांनी टेम्पोचालकाला वारंवार समजवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्याने दहा ते बारा वार हे त्या दुचाकीस्वारावर केले. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला होता. यातील काही नागरिकांनी तत्काळ 112 नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी झालेली वाहतूक कोंडी दूर केली. पोलिसांची पुढील कार्यवाही सुरु असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.