कात्रज, (पुणे) : अज्ञात व्यक्तीने झाडांच्या फांद्या पेटवल्याने पार्क केलेल्या एका स्विफ्ट कारला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना धनकवडी स्मशानभुमीच्या मागील रस्त्यावरील रामचंद्र नगर परिसरातील गणपती विसर्जन हौदच्या जवळ असलेल्या फिडर पॉईंट येथे सोमवारी (ता.२९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार जळून खाक झाली आहे. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिडर पॉईंटजवळ दुपारच्या सुमारास अनेक गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. या परिसरात झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने झाडांच्या फांद्या एकत्र करण्यात आल्या होत्या. या फांद्यांच्या ५ फुट अंतरावर एक अज्ञात चालक त्याची स्विफ्ट कार लावून बाहेर गेला होता. दरम्यान, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाडांच्या फाद्यांना आग लागली कि अज्ञात इसमाने आग लावली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, या आगीने रौद्ररूप धारण केले होते.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक मयुर भिंताडे यांनी तत्काळ या घटनेची माहिती पतित पावन संघटना खडकवासला विभागाचे अध्यक्ष विजय क्षीरसागर यांना दिली. त्यानंतर क्षीरसागर यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अथांग प्रयात्नानंतर आग विझविण्यास यश आले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.