उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर, थेऊर फाटा ते कोरेगाव मूळ परिसरात रेल्वे विभागाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून कंपाऊंडचे काम सुरु केले आहे. या कामाची चौकशी करून हे काम ताबडतोब थांबवावे असे निवेदन सोरतापवाडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, थेऊर फाटा, ते कोरेगावमूळ परिसरात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून कंपाऊंडचे काम सुरु केले आहे. रेल्वे एक़्वायर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रात अतिक्रमण करून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करून सदर ठिकाणी कंपाऊंडचे काम सुरु केले आहे. कसल्याही प्रकारची पूर्वकल्पना, नोटीस, मोजणी न करता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे हे काम थांबवावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान लोणी काळभोर स्टेशन, थेऊर फाटा व कोरेगाव मूळ येथील काही शेतकऱ्यांनी रेल्वे विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहितीही यावेळी पुणे प्राईम न्यूजला दिली आहे. सदरचे निवेदन शेतकरी अनिल चौधरी, वंदना चौधरी, संभाजी चौधरी, बाळासाहेब चौधरी, सुजित चौधरी, राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष अमोल चौधरी, राहुल चौधरी, शुभम चोरगे, अमोल पाटील, सुजित हाके, सिद्धांत चौधरी आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, “सदर विषयाची चौकशी करून शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांवर कोणी गदा आणत असेल तर कारवाई करण्यात येईल.”
दरम्यान, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनीही जिल्हाधिकारी यांच्या नावाने निवेदन दिले असून शेतकरी हा भुमीहीन होत असून इंग्रज राजवटीप्रमाणे विरोध केला तर रेल्वे पोलिस बंदोबस्तात तुरूंगात टाकू अश्या धमक्या शेतकऱ्यांना रेल्वे कर्मचारी देत आहेत. रेल्वे एक्वायर क्षेत्र सोडून शेतकऱ्यांच्या मालकी हक्कात अतिक्रमण करून कंपाऊंड करणे हे रेल्वे विभागाने थांबवावे असे आदेश रेल्वे विभागाला आपण द्यावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी आमदार कटके यांनीही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.