बारामती, (पुणे) : बारामती लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. अशातच आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी पाऊण तास चर्चा केली आहे.
त्यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, काहीच दिवसांपूर्वी बारामतीतील अजित पवार गटाची जागा सुनेत्रा पवार यांना दिली आहे. याची वेगळी घोषणा करण्याची गरज नाही आहे, असं विधान केलं आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार प्रचारासाठी बाहेर पडण्याआधी आम्ही एकत्र चहा घेतल्याचं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कालच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भाजपने ठरवलं आहे की आपण पुढाकार घेऊन सगळ्या पक्षांचा समन्वय राखला गेला पाहिजे. यामुळे 48 च्या 48 जागा जिंकणं अवघड राहणार नाही. माझ्याकडे तीन लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आहे. यामध्ये बारामती शिरूर आणि पुण्याची जबाबदारी आहे.
विधानसभांचा 50 जणांचा क्लस्टर अशी एकूण 300 जणांची बारामतीत बैठक आहे. या बैठकीत काय बोलायचं आणि काय बोलू नये, यासंदर्भात चर्चा होणार आहे. मात्र त्यापूर्वी सुनेत्रा पवार प्रचारासाठी बाहेर पडण्याआधी आम्ही एकत्र चहा घेतला, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.