न्हावरे,ता. 27: शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा, निमोणे आणि अण्णापूर येथे शिरूर पोलिसांनी शुक्रवारी (ता.27) अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून ,त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांकडून देशी, विदेशी व गावठी अशी सुमारे नऊ हजार रुपये किमतीची साडे अठरा लिटर दारू जप्त केली आहे.
मांडवगण फराटा येथील रानवारा हॉटेलवर कारवाई करून हॉटेल चालक प्रदीप कुबेर गिरी(वय 40, रा.रामलिंगरोड-शिरूर ,ता.शिरूर, जि.पुणे) याच्यावर शिरूर पोलिसांनी हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारू विक्री केल्यामुळे कारवाई करून दारू जप्त केली. तसेच आण्णापूर येथे स्वप्नील दिनकर शिंदे (वय-32, रा.अण्णापूर, ता.शिरूर, जि.पुणे) याच्यावर पोलिसांनी अण्णापूर येथील शिरूर-मलठण रस्त्यालगत एका हॉटेलच्या पाठीमागे अवैधरित्या दारू विक्री करताना कारवाई केली आहे.
त्याचप्रमाणे निमोणे येथे ताराचंद बाजीराव चौघुले (वय- 53,रा.निमोणे, ता.शिरूर, जि.पुणे) याच्यावरही शिरूर पोलिसांनी कारवाई केली. चौघुले हा गावठी दारू स्वतःजवळ बाळगून अवैधरित्या विक्री करत होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली.
मात्र, पोलीस कारवाई करण्यासाठी गेले असता, चौघुले याला पोलिसांची चाहूल लागताच कारवाईच्या भीतीने चौघुले हा दारूचे कॅन सोडून पळून गेला आहे. पोलिसांनी चौघुले याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित कारवाई शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी मिळून केली आहे.
शिरूरच्या पूर्व भागामध्ये अवैधरित्या गावठी दारू तयार करून विक्री करणारे मोठे रॅकेट आहे. त्यांच्यावरही कारवाई व्हावी. अशी मागणी होत आहे. तसेच महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना, न्हावरे येथून लाखो रुपयांच्या गुटख्याची विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. अशा गुटखा तस्करीवरही पोलिसांनी कारवाई करून गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात अशी आग्रही मागणी होत आहे.