युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा पारा चढला आहे. ग्रामीण भागात शेतशिवारात कापणी केलेली बाजरीची कणसे दिसू लागली आहेत. बाजरीच्या पिकाची मळणी करण्यासाठी शेतकरी कामात गुंतला आहे. आलेल्या पिकातून चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
जून, जुलै महिन्यात मान्सूनच्या गैरहजेरीमुळे पेरण्या रखडल्या होत्या. त्यानंतर झालेल्या रिमझिम पावसाची शेताला ओल मिळाली. या ओलीवर शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली होती. (Shirur News) शिरूर तालुक्यात खरीप हंगामातील ५८.११ टक्के पेरणी झाली होती. मात्र, कडधान्याची पेरणी झाली नसल्याने मूग, मटकी, हुलगे यासारखी कडधान्ये बाजारात दिसली नाहीत. त्यात पुन्हा पावसाचा खंड पडल्याने झालेल्या पेरणीतून ५० टक्के पीक वाया गेले आहे. घोड व कुकडी नदी व डिंभा उजवा कालवा व चासकमानचा उजवा कालवा यांच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन झाले. त्यानंतर मध्यतंरीच्या काळात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने बाजरी पिकाला जीवदान मिळाले.
बाजरीचे पीक शेतावर डोलू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. परतीच्या मान्सूनमुळे या पिकाला चांगला आधार मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भासहीत काही भागांत कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे.(Shirur News) पुढील दोन दिवसांत मान्सुन माघार घेण्याची शक्यता आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी असलेल्या आर्दतेमुळे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या काळात बाजरी पिकाची मळणी करण्यासाठी शेतशिवारावर मळणी यंत्रे फिरू लागली आहेत.
साधारण नवरात्र काळात पाऊस होण्याची शक्यता सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करत असतो. त्यामुळे या पावसाअगोदर वर्षभराची चंदी असणारे बाजरीचे पिक तयार करून घेण्यासाठी शेतकरी लगबग करत आहे. काही ठिकाणी बाजरी पिकाचे पक्षांपासून संरक्षण करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी शिरूर तालुक्यात ११ हजार २२६ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली होती. या वर्षी १० हजार ६०६ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
पावसाच्या ओलीवर बाजरीच्या पीकाची पेरणी केली. त्यातून या पिकाला पाणी देऊन उभे केले. पण नंतरच्या मान्सूनच्या परतीच्या पावसाने या पिकाला जीवदान दिले. त्यामुळे हे पीक जोमाने आले आहे, असे चांडोहचे पोलीस पाटील सुदर्शन भाकरे यांनी सांगितले.
यावर्षी बाजरी पिकाची पेरणी अगदी कमी क्षेत्रावर झाली आहे. त्यातून योग्य पोषक हवामान व पाण्याचे व्यवस्थापन झाले. त्यामुळे बाजरीचे पीक हाताशी आले आहे. (Shirur News) यावर्षी बाजरीच्या पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे, असे चांडोहचे शेतकरी म्हतारबा शेलार यांनी सांगितले.