पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरुडमध्ये अज्ञातांनी तीन गोळ्या झाडून भरदिवसा हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, कोथरूड परिसरात दहशत असणाऱ्या अजून एका गुंडाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट घेतल्याने खळबळ उडाली. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उत आला.
आता त्यावरून शरद पवार गटाने जोरदार निशाणा साधला आहे. मनी, मसल आणि पॉवर हे भारतीय जनता पक्षाचे सूत्र अजित पवार मित्र मंडळानेही अवलंबले आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी विचारला आहे.
प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की, आज पुण्यात गुन्हेगारी जगतात आनंदाचे वातावरण असेल. ज्या ज्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतात तेव्हा गुन्हेगारी क्षेत्रात आनंद असतो. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पुणे शहर पदाधिकाऱ्यांसोबत गुंड गजा मारणेच्या घरी जाऊन भेट दिली. त्यांच्यासोबत चहापाणी करत गुंडाची प्रतिष्ठा वाढवली. अजित पवार मित्र मंडळाचे पदाधिकारी पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेऊन राजकारणात मनी, मसल आणि पॉवर हे अजित पवारांचेही सूत्र आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
तसेच एकेकाळी पुणे शहरातील कोयता गँगबाबत विरोधी पक्षनेता असताना अजित पवारांनी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यानंतर आता पुण्यातील एका गुंडाच्या घरी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पदाधिकाऱ्यासोबत जातात. गुंड आणि भ्रष्ट लोकांची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम सरकार आणि सरकारमधील लोक करत आहेत. हा भारताच्या लोकशाहीला, राजकारणाला कलंक आहे. सध्या राजकारणात तत्वे, नितिमत्ता गुंडाळून महाराष्ट्रात जे सुरू आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता गुंड गजा मारणेसोबत कधी फोटो काढतात आणि त्याला गाडीत घेऊन फिरतात हेच आम्हाला बघायचे आहे, असा जोरदार टोलाही विकास लवांडे यांनी लगावला आहे.