पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात तब्बल १० हजारहून अधिक ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये दोघांच्या संभाषणात आता तिसऱ्याच नाव समोर आलं आहे. अभिजीत मानकर असं आरोपीच नाव आहे. पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडलं आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत मुख्य आरोपीसह १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अभिजीत मानकर हा ३१ वर्षाचा आहे. ऑडिओ क्लिपमार्फत पुणे पोलीस अभिजित मानकरपर्यंत पोहचले असून त्याला थेट बेड्या ठोकल्या आहेत.
असं पकडलं अभिजीत मानकरला?
शरद मोहोळ खून प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहे. आतापर्यंत १६ आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रत्येक आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी मोठा प्लॅन आखला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तब्बल १८ हजार ऑडिओ क्लिप तपासल्या आहेत.
शरद मोहोळ आणि आरोपींच्या मोबाईलमधून या सर्व क्लिप सापडल्या आहेत. यातील १०५०० ऑडिओ क्लिप तपासल्या नंतर ६ ऑडियो क्लिप संशयास्पद आढळल्या आहेत. या तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचे नाव समोर आले. हे ऐकून पुणे पोलिसांनी अभिजित मानकरचा शोध सुरु करत सापळा रचून गुन्हे शाखेने मानकरला अटक केली.
पुणे पोलिसांन शरद मोहोळ खून प्रकरणात याआधी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे आणि आता अभिजित मानकरला अटक करण्यात यश आलं आहे