पुणे: भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. ईव्हीएमचा पूर्वी मीसुद्धा समर्थक होतो, परंतु मध्य प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माझी खात्री पटली आहे की, ईव्हीएममध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच घोटाळा केला आहे. त्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे. जर ईव्हीएम नसेल तर भाजप देशांमधील एकही ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या युवा संसदेमध्ये संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.
संजय राऊत म्हणाले, राजकारण करायचे असेल तर मनामध्ये भीती बाळगून चालत नाही. भीती खुंटीला टांगल्याशिवाय राजकारणामध्ये यशस्वी होता येत नाही. राजकारणामध्ये विरोधकांचाही सन्मान केला पाहिजे, ही शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली. परंतु, सध्या मात्र विरोधकांना संपवण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सुरू आहे. या संघर्षामध्ये शिवसेना कायम लढत राहणार आहे. माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप केले जातात. परंतु, जे आरोप करतात तेच लोक शिवसेना सोडून जातात. आम्ही मात्र शिवसेना वाचवण्याचे काम गेल्या ४० वर्षांपासून करत आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत.
ते पुढे म्हणाले, देशाच्या संसदेमध्ये गेल्या २२ वर्षांपासून मी खासदार म्हणून काम करत आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांमध्ये संसद लोकशाहीचे मंदिर राहिलेले नाही, तर त्या ठिकाणी केवळ आरडाओरडा करून एकमेकांचे गळे दाबण्याचे आणि लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे. देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे. भ्रष्टाचार वाढत आहे, मात्र या संबंधात बोलणाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकले जाते.
महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारेच आज सत्तेमध्ये बसले आहे, अशा लोकांवर थुंकायचे नाही तर काय फुले उधळायची का? कोणी एकेकाळी महाराष्ट्र दिल्लीमध्ये ताठ मान करून वावरत होता. आज मात्र या भ्रष्टाचारी आणि बेईमान लोकांमुळे महाराष्ट्राची मान संपूर्ण देशांमध्ये शरमेने खाली गेली आहे. त्यांच्या विरोधातील लढा शिवसेना कायम सुरू ठेवणार आहे, असा निर्धार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्या महाराष्ट्रामध्ये नौटंकी सुरु
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. तीन नेत्यांचा एकमेकांमध्ये संवाद नाही, राज्यकारभाराच्या नावाखाली बेबनाव सुरू आहे. एका मंत्र्याने मराठ्यांची बाजू घ्यायच, दुसऱ्या मंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, अशा प्रकारची नौटंकी सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही ठोस भूमिका न घेता केवळ मराठ्यांचीच नव्हे तर ओबीसींची फसवणूक होत आहे. हे हा समाज उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि हा समाज त्यांना निवडणुकीमध्ये निश्चितच उत्तर देईल, असंही संजय राऊत म्हणाले.