पुणे : पुण्यात रिक्षावाल्यांनी बाइक टॅक्सी सेवा देणार्या कंपन्यांवर कारवाई करुन ती तात्काळ बंद करावी, या मागणीसाठी आरटीओ समोर ठिय्या आंदोलन सोमवारी (ता.२८) करण्यात आले होते. तेव्हा रिक्षावाल्यांनी आरटीओ चौकातील वाहतूक अडवून शासकीय अधिकार्यांच्या आदेशाचा अवमान केला असल्याने रिक्षा संघटनांच्या नेत्यांसह अडीच हजार रिक्षाचालकांवर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश व इतर २३०० ते २५०० रिक्षाचालकांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओ कार्यालयाबाहेर विविध रिक्षा संघटनांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण परिसरात रिक्षा उभ्या करुन वाहतूक अडविली होती. सकाळी १० वाजता सुरु झालेले हे आंदोलन पालकमंत्री व इतरांच्या आश्वासनानंतर रात्री सव्वाआठ वाजता मागे घेण्यात आले.
दरम्यान, या काळात परिसरातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलन काळात संपूर्ण चौकातील वाहतूक अडवून स्पीकरवरुन घोषणा देऊन बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना आंदोलन न करण्याबाबत सूचना व आदेश दिले होते. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केला.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश व इतर २३०० ते २५०० रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.