लोणी काळभोर : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा उरुळीकांचन (ता. हवेली) येथील परतीचा मुक्काम काही कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी तात्पुरत्या स्वरुपात कदमवाकवस्ती (लोणी काळभोर, ता. हवेली) येथील पालखी तळावर होणार आहे. अशी माहिती संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल मोरे यांनी सांगितले आहे.
आषाढी वारी झाल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. पालखी सोहळा पंढरपूरहून देहूकडे परतीचा प्रवास करीत आहे. यवत येथे हा पालखी सोहळा रविवारी (ता.28) येथे दुपारची विश्रांती घेणार आहे. त्यानंतर हा पालखी सोहळा दरवर्षी उरुळी कांचन येथे मुक्कामी थांबत असतो.
यावर्षी हा सोहळा उरुळी कांचन येथील मुक्कामाला न थांबता कदमवाकवस्ती (लोणी काळभोर) येथील पालखी स्थळावर रविवारी (ता.28) मुक्कामी थांबणार आहे. पुढील वर्षीच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची व कार्यक्रमाची रूपरेषा परिपत्रकाद्वारे सांगण्यात येईल. असे पत्राद्वारे विशाल मोरे यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे (दि. 3 जुलै) ला दुपारी पोहचल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यातील नगारा बैलगाडा अडविण्याचा प्रयत्न केला होता. पालखी रोखल्याने सोहळ्याचे विश्वस्त आणि गावकरी यांच्यात वादावादी झाली. पालखी सोहळ्याला अडथळा निर्माण करणाऱ्या ग्रामस्थांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.