यवत(पुणे): संपूर्ण राज्यात सन 2025 ते 2030 या वर्षासाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून
यामध्ये दि. 23 रोजी दौंड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतिचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने यापैकी 70 ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी फेर आरक्षण सोडत होणार असल्याने अनेकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील दि. 05/03/2025 ते 04/03/2030 या कालावधीतील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत दि. 23/04/2025 रोजी काढण्यात आली होती.
सदर सोडतीमध्ये अनुसूचित जमातीचे निघालेल्या आरक्षणामध्ये तांत्रिक त्रुटी राहील्यामुळे सदर आरक्षण बदलने आवश्यक असून त्यानुसार त्यापुढील सर्व आरक्षणे बदलणार आहेत.
याबाबत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या आदेशानुसार उद्या शुक्रवार दि. 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता दौंड तहसिल कार्यालय येथील सभागृहात सर्व 70 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी फेर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.