लोणी काळभोर, (पुणे) : जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेजाऱ्याने घरासमोर आलेल्या एका १८ महिन्यांच्या पामोलीव्ह जातीच्या श्वानाला रस्त्यावर आपटून आपटून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण इंद्रजित घुगे ( वय – ३१, रा. गायधरा, वडकी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ज्योती धनराज पाटील (वय 36, रा. अविसा पार्क सोसायटी, गायधरा वडकी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील या कुटुंबीयांसोबत वडकी परिसरात राहतात. तर अरुण घुगे हे त्यांच्या शेजारी राहतात. पाटील यांच्याकडे पामोलीव्ह जातीचे पांढऱ्या रंगाचे तीन पाळीव श्वान आहेत. त्यापैकी 01 मादी व 02 नर आहेत. यापूर्वी शेजारी राहणाऱ्या अरुण घुगे याच्या अंगावर पाळीव श्वान धावून जाण्याच्या कारणावरुन वाद झालेला होता.
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळ सुटले होते. त्यामुळे राहत्या घरावरील पत्रे वाऱ्याने हलत असल्याने पाटील यांचा मुलगा यश घरावरील पत्र्यावर दगड ठेवण्यासाठी पत्र्यावर चढला होता. तेव्हा पाटील व त्यांची मुलगी त्याला मदत करीत होते. यावेळी घरासमोरील गेट वाऱ्यामुळे उघडल्याने घरातील दोन पाळीव श्वान बाहेर पळाले. दोन्ही श्वान शेजारी राहणाऱ्या अरुण घुगे याच्या घराकडे धावत गेले. यावेळी घुगे हा घरासमोर बसला होता.
श्वान घरासमोर आले असता अरुण घुगे याने सदर दोन श्वानांपैकी पामोलीव्ह जातीच्या श्वानास (वय 18 महीने) पकडून त्याला रस्त्यावर दोन ते तीन वेळेस जोरात आपटले. यावेळी पाटील व त्यांचे कुटुंबीय श्वानाजवळ गेले असता श्वान निपचित पडल्याचे दिसले. यावेळी पाटील यांनी अरुण घुगे यास मुक्या प्राण्यांना का मारले असे विचारले असता, त्याने तुझी कुत्री नीट सांभळता येत नाहीत का? असे म्हणत तुला काय करायचे ते कर, पुन्हा माझ्या दारात तुझे कुत्रे आले तर, तुला पण असेच आपटून मारेन, अशी धमकी देत शिवीगाळ केली.
दरम्यान, श्वान जखमी झाल्याने त्याला तात्काळ उपचारकामी पशु वैद्यकीय दवाखाना, श्रेणी-2, उरुळी देवाची येथे नेण्यात आले. सदर ठिकाणी असणाऱ्या पशु वैद्यकीय अधिकारी यांनी श्वानास तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अरुण इंद्रजित घुगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.