पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी अधिकृत वाहनतळ वगळता दोनशे मीटरच्या परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई केली आहे. या भागात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मोटारी व रिक्षांना मुभा दिली असली, तरी त्यांना जास्त काळ थांबता येणार नाही.
रेल्वे स्थानकाच्या आवारातील दोन्ही प्रवेशद्वारांवर (इन आणि आउट गेट) बेशिस्तपणे वाहने लावण्यात येत असल्याने येथील वाहतूक विस्कळीत होत होती. रेल्वे स्थानकाच्या आवारातील कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार व वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची बैठक झाली होती.