पुणे : अयोध्येतील राममंदिर येथे होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचनेद्वारे २२ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली आहे. परिणामी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २२ जानेवारी रोजीच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले.
पुणे विद्यापीठातर्फे सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. २२ जानेवारी रोजी सुद्धा काही विषयांच्या परीक्षा नियोजित होत्या. परंतु, शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे या परीक्षा स्थगित केल्या जात असल्याचे काकडे यांनी सांगितलं.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार २२ जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २२ जानेवारी रोजी आयोजित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. २२ जानेवारी रोजीच्या परीक्षा आयोजनाबाबत यशावकाश कळवण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.