पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटार सायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या ५७१ दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मागील दोन दिवसात विमानतळ, हांडेवाडी, कोरेगाव पार्क, डेक्कन, भारती विदयापीठ तसेच हडपसर वाहतूक विभागात ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा प्रकारचे सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करावी, असे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले आहेत.
शहरातील अनेक वस्त्यांमध्ये दिवसरात्र सायलेन्सरमध्ये फेरबदल केलेले वाहन वापरून कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणात भर टाकत आहेत. अशा मोटरसायकल चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण पुणे शहरात विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याबाबत पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत फेरबदल केलेल्या सायलेन्सच्या मोटरसायकल चालवताना वाहनचालक आढळून आल्यास त्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेच्या व्हॉटसअॅप क्रमांक 8087240400 वर वाहन क्रमांक व लोकेशनसह कळवावी. तसेच अशा प्रकारचे सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांवरसुद्धा कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.