(Pune News) पुणे : मुस्लीम महिलांना पुण्याप्रमाणेच देशभरातील इतर मशिदीमध्ये जाऊन नमाज पठण करु द्यावे. अशी मागणी पुण्यातील (Pune News )दाम्पत्याने सर्वोच्च न्यायलयाकडे केली आहे. यासाठी जोडप्याने मागील वर्षी रमजान महिन्यापासून लढा सुरु केला होता.
पुण्यातील बोपोडी भागातील या मशिदीतून मुस्लीम महिलांना नमाज पठणाचा अधिकार मिळावा यासाठी संघर्ष सुरु झाला होता. यासाठी अन्वर शेख आणि त्यांची पत्नी फरहान शेख यांनी बोपोडीतील मशिदीत महिलांना नमाज पठणाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी त्या मागणीला नकार देण्यात आला होता. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि देश पातळीवर पोहोचले. मात्र आता वर्षभरानंतर या मशिदीत मुस्लीम महिलांना नमाज पठणाची परवानगी देण्यात आली आहे. या बदलाबाबत या मुस्लीम महिला समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.
महिलांना मशिदीत प्रवेश देण्याची मागणी…!
मागील वर्षी रमजानच्या खरेदीसाठी हे जोडपं पुणे कॅम्प भागात गेलं होतं. मात्र नमाज अदा करण्याची वेळ जवळ आल्यावर फक्त अन्वर शेख यांना मशिदीत प्रवेश देण्यात आला. फरहान यांना मात्र बाहेर पावसात भिजत उभं राहावं लागलं. त्यानंतर या जोडप्याने ते राहात असलेल्या या बोपोडीतील मशिदीच्या व्यवस्थापनाकडे महिलांना मशिदीत प्रवेश देण्याची मागणी केली. मात्र त्याला नकार देण्यात आल्याने या जोडप्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
दरम्यान, लढ्याची दखल घेत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाला मशिदींमध्ये महिलांना नमाज पठणाचा अधिकार असल्याच मान्य करावं लागलं. यामुळे मागील रमजान महिन्यात जिथे महिलांन मज्जाव होता त्याच मशिदीत या रमजान महिन्यात मुस्लीम महिला नमाज पठण करताना दिसत आहेत. देशभरातील सगळ्या महिलांनाही मशिदीत जाऊन नमाज पठण करु द्या, अशी मागणी जोडप्याने केली आहे.