Pune News : पुणे : वनस्पतीशास्त्र किंवा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वनस्पतींची गरज असते. त्यामुळे स्वत:चे उद्यान असावे या कल्पनेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात अमृत उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. हत्तीखाना सरोवराजवळ हे उद्यान आकाराला येणार असून, या उद्यानात ७५ आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.
७५ आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करणार
विद्यापीठाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने उद्यान निर्मितीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला कुलगुरूंनी मान्यता दिली. (Pune News) त्यानुसार या उद्यानाची निर्मिती करण्यासाठी ७५ आयुर्वेदिक वनस्पतींचे रोपण करण्यात आले.
वृक्षारोपण करून कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी अमृत उद्यान निर्मिती उपक्रमाचा प्रारंभ केला. या वेळी बोलताना डॉ. गोसावी म्हणाले, की अलीकडेच विद्यापीठातील हत्तीखान्याच्या सरोवराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच नक्षत्र उद्यानही साकारण्यात आले आहे. (Pune News) त्यामुळे हा परिसर चांगल्या पद्धतीने विकसित होईल. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.
या आगळ्या-वेगळ्या वनस्पती उद्यानामध्ये ७५ आयुर्वेदिक आणि देशी वनस्पतींचा समावेश आहे. त्यात रुद्राक्ष, पळस, अर्जून, शिकेकाई, हिरडा, बेहडा, रिठा, कदंब, कापूर, आवळा, शमी, सीताअशोक, गुग्गुळ, मेहंदी, बेल, आपटा, बकुळ, अजानवृक्ष, नागकेशर, उंबर, रोहितक, डिकेमाळ, चारोळी, करंज, काटेसावर, शिसम, कडुनिंब, बूच, कृष्णवड, बिब्बा, कांचन, सुरंगी, कुसुम, मुरुडशेंग, गोरखचिंच, पांगारा, सेंद्री, मंदार, आपटा, भोकर, खैर, रक्तचंदन, अंजन, पुत्रांजीवा, तुती, कैलास्पती, लक्ष्मीतरू आदी वृक्षांचा समावेश असणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कोरेगाव पार्क, मुंढवा येरवडा भागात जड वाहनांना बंदी