पुणे: राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना भेटीसाठीची वेळ निश्चित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पुणे शहरासह जिल्हा निबंधक या कार्यालयामध्ये नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार ते शुक्रवार दुपारी तीन ते पाच अशी वेळ निश्चित केली आहे. मात्र दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि संरक्षण सेवेतील नागरिकांना यांना मात्र वेळेची मर्यादा लागू नाही. या व्यक्ती सोमवार ते शुक्रवार कोणत्याही वेळेत पुणे शहरासह जिल्हा निबंधक यांना भेटू शकतात, असे पुणे शहर सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री यांनी निशित केलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी दैनंदिन वेळ राखून ठेवावी, अशा सूचना दिल्या होत्या. याबाबत हिंगाणे यांनी सांगितले की, सकाळ सत्रातील दुय्यम निबंधक कार्यालय तसेच नियमीत वेळेतील कार्यालयात आणि विवाह अधिकारी पुणे यांना भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दुपारी २ ते ३ ही वेळ निश्चित करण्यात येत आहे. तसेच दुपार सत्रातील दुय्यम निबंधक हवेली क्र.११.१७ व २२ यांना भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी दुपारी ४.३०. अते ५.०० ही वेळ निश्चीत करण्यात आली आहे. तर दुय्यम निबंधक हवेली क्र. ०१ ते ०९ कार्यालयतील जुन्या दस्तांच्या बाबतीत भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी ११ ते दुपारी २ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.