पुणे : गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवरील आकर्षक व्हिडिओ आणि रील्स पाहून ‘व्हिला’ बुक करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. यातच आता पुण्यातील 22 तरुणांना व्हिला बुकींग करणे चांगलेच महागात पडलं आहे. या तरुणांची 36 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील या तरुणांनी इन्स्टाग्रामवरील ‘@stayzuly’ या प्रोफाइलवरून एक आकर्षक व्हिला बुक केला. या पेजवर ८२ हजार फॉलोअर्स, व्हिलाचे खरे वाटणारे फोटो आणि वैध वाटणारे फोन नंबर दिले होते. सुरुवातीला बुकिंगसाठी तीन हजार रुपये आणि त्यानंतर एकूण १८ हजार रुपयांपर्यंत रक्कम त्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आले . त्यानंतर त्याची किंमत तब्बल 36 हजार रुपये असल्याचे सांगितलं. मात्र या तरुणांनी लोणावळ्यात पोहचल्यावर संबंधित इंस्टाग्राम मोबाईलवर संपर्क साधल्यावर मोबाईल नंबर बंद होता.आपली फसवणूक झाल्याची तरुणांच्या लक्षात आले.
दरम्यान या तरुणांना मोबाईलवर मेसेज आला की कुटुंबातील सदस्याला हृदयविकाराचा झटका आला असल्यामुळे व्हीला बुकिंग रद्द करण्यात आले आहे. तुमची रक्कम परत करण्यासाठी बँक खात्याचा तपशील पाठवावा. दरम्यान तरुण हे प्रत्यक्षात व्हीलाच्या पत्त्यावर पोहचले असता मालकाने आम्ही कोणताही व्यवहार केला नाही. अशी कोणतीही जाहिरात आम्ही इंस्टाग्रामच्या पेजवर करत नाही असे सांगितले. दरम्यान या प्रकरणी सायबर पोलिसांनी दक्षतेचे आवाहन केले आहे.