युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विद्युत रोहीत्रांच्या चोरीचे सत्र सुरूच असून शेती व्यवसायाला अडचण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील साबळेवाडी जवळ विद्युत रोहित्रावर सोमवारी (दि.१३) रात्री दिवाळी पाडव्याच्या पूर्व संध्येला चोरट्यांनी डल्ला मारला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले असून शेती व्यवसायासाठी पाणी योग्य वेळी वेळी देता आले नाही तर शेतीचे दिवाळे निघेल.
अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येऊ लागल्या आहेत. सध्या कांदा लागवडीची लगबग सुरू असताना वीज पुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे खंडीत झालेला विज प्रवाह तत्काळ सुरू करण्यात यावा. अशी मागणी होऊ लागली आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत.
या बाबतची दखल घेऊन महिण्यापुर्वी शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी लक्ष घालून कठोर कारवाईसाठी कडक अंमलबजावणी केली होती. सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, एकनाथ पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रकरणी काहींना गजाआड केले. मात्र महिनाभराच्या आतच विद्युत रोहित्रची चोरी झाल्याने हे चोर शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
सध्या पाणी असल्याने शेती व्यवसायासाठी विजेची आवश्यकता आहे. त्यामुळे विजेची आवश्यकता असल्याने तत्काळ रोहित्र बसवावे. खंडीत विज पुरवठा सुरू करावा. रोहित्र चोरीवर ग्रामस्थांनी देखील नजर टेवून संशय आल्यास तत्काळ पोलिस स्टेशनला या बाबत माहिती द्यावी. असे घोड व कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य व अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी सांगितले.