उरुळी कांचन : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कायद्याचे उल्लंघन न करता शांततेत व आनंदात उत्सव साजरा करावा, असे आवाहन उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ नये याकरिता पारंपरिक वाद्य वाजवावेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलीस ठाण्यात आगामी गणेशोत्सवानिमित्त उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी-कार्यकर्ते, पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता. 05) करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.
यावेळी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, उरुळी कांचनचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीगरे, पोलीस काँस्टेबल राजकुमार भिसे, रवीकुमार फड, पोलीस पाटील विजय टिळेकर, दत्तात्रय चौधरी, परिसरातील गावातील मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, तसेच विविध गावाचे पोलीस पाटील उपस्थित होते.
दरम्यान, आगामी गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्व नियमांची माहिती देऊन, नियमांचे तंतोतंत पालन करण्याबाबत तसेच मंडळाचे वतीने घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम वेळेत घेण्याबाबत व विसर्जन मिरवणुकीचे अनुषंगाने योग्य त्या सूचना देण्यात आल्या. तसेच ध्वनी प्रदूषण होऊ नये याकरिता पारंपरिक वाद्य वाजवावेत. मंङळांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, महिलांचे सुरक्षिता घेणेबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.