उरुळी कांचन : उरुळी कांचनसह परिसरात ऊस पिकाच्या क्षेत्रात हुमणी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल बनले आहेत. ऊस पिकाची पुरेशी उंची व मुळांची वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांना रासायनिक औषधांचा वापर करावा लागत आहे. पिकांना महागडी औषधे पाण्यासोबत द्यावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
यावर्षी ऊस पिकाला मिळालेल्या समाधानकारक दरामुळे येथे उसाच्या लागवडीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच यंदा मनासारखा आणखी पाउस न झाल्याने उसाच्या पिकावर हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन घटणार असल्याची शक्यता उरुळी कांचन, शिंदवणे, टिळेकरवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
ऊस पिकांत हुमणी किडीच्या प्रदुर्भावेने शेतकऱ्यांना हादरवून सोडले आहे. हलक्या जमिनीतील हुमणी कीड मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. ऊस पिवळा पडू लागला आहे. ऊस हिरवा दिसत असला तरी मुळात पोखरल्याने वाढ खुंटली आहे. हुमणीच्या नियंत्रणासाठी उसाला पाटाने पाणी देण्याची गरज असते. पुरेसे पाणी नसल्याने हा उपायही शेतकरी करूच शकत नाहीत. दमट हवामानामुळे लोकरी मावाही काही प्रमाणात दिसतो आहे याचा .परिणाम उत्पादन घटण्यावर होणार आहे.
पूर्व हवेलीत ऊस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. उसाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण फिरत आहे. मात्र, सध्या परिसरामध्ये ऊस पिकावर हुमणी या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. उसाची मुळे नष्ट झाल्याने ऊस जळून जातो. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावून त्यामध्ये हुमणी किडीचे प्रौढ पकडले जातात आणि नंतर ते नष्ट केले जातात. पण हा उपाय देखील परिणामी ठरताना दिसत नाही. यावर कृषी खात्याने शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.
जून महिन्यात पाऊस झाला की ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत पाण्याचा फारसा ताण जाणवत नाही. महिन्यातून एखादे पाणी देऊन उसाची गरज भागवण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, यंदा परिस्थिती बदलली आहे. ऊसपट्टयात पाणी साचून रहावे असा पाऊसच झाला नाही. पाण्याची मोठी कमतरता जाणवते आहे. परिणामी उसाची वाढ खुंटली आहे. हुमणीच्या अळ्या पिकांची मुळे खाऊन टाकतात आणि त्यामुळे उसाची बेटे कोलमडून पडतात. उसाची मुळे नष्ट झाल्याने ऊस जळून जातो. ऊस पिकासाठी ही कीड अत्यंत धोकादायक मानली जाते.
याबाबत बोलताना मंडल कृषी अधिकारी गुलाबराव कडलक म्हणाले, “पावसाळ्यात पाऊस पडण्यास वीस दिवसांपेक्षा जास्त खंड पडला, तर जमिनीतील कोरडेपणा वाढून हुमणी अळीच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते. हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. कृषी विभागाने कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे व औषध फवारणीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. परंतु पावसाच्या लांबण्यामुळे हा प्रादुर्भाव पुन्हा जोमाने वाढला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी सुचवलेल्या उपायांची उपाययोजना करावी.”
याबाबत बोलताना शिंदवणे (ता. हवेली) येथील शेतकरी गुरुनाथ मचाले म्हणाले, “पाण्याची कमतरता आणि कमी पाऊसामुळे जास्त प्रमाणात हुमणी मुळे उसासह दुसऱ्या पिकांचेही नुकसान होत आहे. पाण्यातून कीटकनाशक सोडले आहे. तरीही हुमणी रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. सरकारने हुमणीवरील प्रतिबंधक औषधांचा शेतकऱ्यांना पुरवठा करावा.