लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात खुलेआम सुरू असलेल्या पनती पाकुळी सोरट अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 11) सायंकाळी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी दोघांना अटक करून सुमारे 82 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजेभाऊ शेषराव मुसळे (वय 40 , रा. थेऊर गाव, गणपती मंदिराच्या मागे, थेऊर ता. हवेली, जि. पुणे ) व राम राजेंद्र गिरे (वय 36 रा. गाढवे मळा कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर रेल्वे उड्डाणपुलाच्या परिसरात रेल्वे पटरीच्या जवळ असलेल्या काटवनामध्ये काही इसम बेकायदेशीररित्या पनती पाकुळी सोरट नावाचा जुगार पैशांवर खेळत आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी मुसळे व गिरे हे दोघे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळ घेत असताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहेत. तर या कारवाईत पोलिसांनी रोख 60 हजार रक्कम व जुगाराचे साहित्य असा 82 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलिस हवालदार महेश चव्हाण, रवि आहेर, पोलिस अंमलदार मल्हार ढमढेरे, मंगेश नानापुरे व संदिप धुमाळ यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान अवैध धंद्यांवरील कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे असे राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे) यांनी सांगितले.