उरुळी कांचन, (पुणे) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या आवारात विद्यालयीन टोळक्याने नंग्या तलवारी घेऊन अक्षरशः हौदौस घातल्याचा अतिशय गंभीर प्रकार मंगळवारी (ता. ०२) सकाळी उघडकीस आला आहे.
तलवारी, हॉकी स्टिक हातात घेऊनच आवारात सुमारे तासभर गोंधळ, दहशत, शिविगाळ व धुडघुस घालण्याचा प्रकार सरु होता. महाविद्यालयाच्या आवारात नंग्या तलवारी दाखवून दहशतीचा नंगानाच घातल्याने उरुळी कांचन शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
उरुळी कांचनमध्ये महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयात दौंड, पुरंदर व हवेली या तीन तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांची टपोरेगिरी, दादागिरी असे सर्रास प्रकार या ठिकाणी सुरू आहेत. अगदी बाहेरील विद्यार्थी शहरात प्रवेश केल्यानंतर दुचाकी वाहनांवरुन घिरट्या घालणे, टोळी टोळीने वावरणे, महाविद्यालयीन आवारात धुडघुस घालने हे नित्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारातून विद्यार्थ्यांनीची छेड काढणे, मारामारी करणे असे सर्रास प्रकार घडत आहेत.
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाच्या बाहेर घडलेला प्रकार आवारात घडूनही शिक्षण संस्थेने कोणतीच कारवाईची दखल घेतली नसून पोलिसांपर्यंत अद्याप तक्रारच झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.प्रत्येक वेळी विद्यार्थी धुडगूस घालतात, विद्यार्थ्यांनीची छेडछाड होते मात्र राजकारणी लोकं या सर्व प्रकारांना दडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे एक दिवस महाविद्यालयात २०१४ प्रमाणे विद्यार्थ्याचा खून होण्याचा प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही असा सवाल ग्रामस्थ करीत आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन गावे अतिसंवेदनशील असल्याने या ठिकाणी काम करणारे पोलीस अधिकारी पण त्याच जोमाचे व ताकदीचे असतील, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, परंतु गेल्या काही वर्षांपासून येणारे अधिकारी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापेक्षा इतर गोष्टींना जास्तच प्राधान्य देत असल्याने खाकी वर्दीची झाकी दुर्मीळ होत चालली असल्याचे नागरिक बिनधास्तपणे बोलून दाखवून एकमेकांत चर्चा करत आहेत.