दीपक खिलारे
इंदापुर : इंदापुर तालुक्यातील वेगवेगळ्या पदावर तसेच परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या तरुण- तरुणींचा पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये ऋतुजा नामदेव होरणे (पळसदेव सहायक कृषी अधिकारी), तसेच हर्षदा अरुण राऊत (निमगाव केतकी) हिला नीट परीक्षेत ६६० गुण मिळाले आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी ना. रा. हायस्कूल इंदापूरमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एस.बी पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा विद्यार्थी ओंकार जाधव याला आर्मो इंजिनिअरिंग नेदरलँडमध्ये नोकरी (३३ लाखांचे पॅकेज) मिळाल्याने अंकिता पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी अंकिता पाटील म्हणाल्या, आपल्या तालुक्यातील तरुण-तरुणींनी वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेऊन नाव कमवलं की, मन अभिमानाने भरून येतं. तालुक्यातील आपल्या शिक्षणाच्या गतीमुळे ते शक्य होतं आहे. कै. शंकरराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उभ्या केलेल्या या संस्थांचे जाळे अनेक तरुणांच्या आयुष्यात एक प्रकाश टाकत आहेत. हे सगळे विद्यार्थी आपल्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेऊन यशस्वी झाले.
याचा मनस्वी आनंद आहेच पण एक दूरदृष्टी ठेवून उभ्या केलेल्या या शिक्षणसंस्था आज अनेकांच्या कर्तृत्वाला वळण देत आहेत, याचा वेगळाच आनंद आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटूंबाचेच नव्हे तर तालुक्याचे नाव मोठं केलं आहे. दरवर्षी अशा प्रकारचा ठसा उमटवण्यात आपला तालुका आणि शिक्षणसंस्था कुठेही मागे नाहीत, ही बाब खूपच आनंददायी आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अंकिता पाटील-ठाकरे यांनी काढले.