प्रकाश सुरवसे / करकंब : येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पुष्पा गुळवे-थिटे यांनी पतीच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रुग्णांच्या सेवेसाठी १५ लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका दान दिली आहे. याशिवाय पाच सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत केली आहे. एवढेच नाही तर पुण्यस्मरण सोहळ्यास आलेल्या सुमारे ३०० आप्तस्वकीयांना ‘बेलाचे रोप’ भेट देऊन आदर्श निर्माण केला आहे. अशा या आधुनिक दानशूर दुर्गा मातेचे कौतुक होत आहे.
गुरुवारी (दि. १०) आदिशक्तीची आठवी माळ गुंफली जात असतानाच करकंब येथील कै. रामलिंग थिटे यांचे प्रथम पुण्यस्मरण केले जात होते. यानिमित्ताने थिटे परिवाराने ह.भ. प. डॉ. किरण महाराज बोधले यांची कीर्तन सेवा ठेवली होती. विशेष म्हणजे यावेळी कै. थिटे यांच्या पत्नी माजी शिक्षण विस्तार अधिकारी पुष्पा गुळमे-थिटे यांनी पतीच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी मान्यवरांच्या हस्ते आंब्याच्या झाडाचे रोपण केले.
नवरात्र उत्सव चालू असतानाच पुष्पा गुळमे-थिटे यांच्या रूपाने आधुनिक दुर्गा मातेने दाखवलेल्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक उन्मेश थिटे हर्षाली थिटे, डॉ. मृदुला तळेकर, डॉ. औदुंबर तळेकर भाऊसाहेब थिटे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती रजनी देशमुख, अमर पाटील, समाधान काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, बाळासाहेब माळी, सुरेश सावंत, हरिदास रणदिवे, मोहन तळेकर, हरिश्चंद्र तळेकर, माऊली तळेकर, विठ्ठलराव शिंदे, कारखान्याचे कार्यकारी संचालक यादव, इंगोले उपस्थित होते.
‘या’ संस्थांना दिली देणगी
पुष्पा गुळमे-थिटे यांचे कार्यक्षेत्र राहिलेल्या अरण येथील संत सावता माळी विद्यालयाला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. करकंब येथे विशेष बालकांसाठी कार्यरत असलेले मैत्र फाउंडेशन, न्यायमूर्ती रानडे सार्वजनिक वाचनालय स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणारी एकलव्य अभ्यासिका आणि अरण येतील संत सावता माळी अन्नछत्र मंडळ यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांची देणगी दिली. थिटे परिवाराने दिलेल्या रुग्णवाहिकेचेही यावेळी लोकार्पण करून पुढील जबाबदारी रखुमाई हॉस्पिटल कडे देण्यात आली. यावेळी आलेल्या सर्व आप्तेष्टांचे बेलाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.