उरुळी कांचन, (पुणे) : कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचारासाठी गेलेल्या तरुणाला चक्क ‘सिस्टर’ नसल्याचे कारण देत उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी शुभम आवारे यांनी सिस्टर नसल्याने उपचार करू शकत नाही, असे लेखी उत्तर दिल्याने अधिकाऱ्याविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच रुग्णाला पोलिसांची भीती दाखवत तुझ्यावर कारवाई करेल, अशी दमदाटी केल्याने ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी अवस्था उरुळी कांचन येथील आरोग्य केंद्राची झाली आहे.
आदेश श्रीहरी राक्षे (वय -२१, रा. इरिगेशन कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे उपचार नाकारलेल्या रुग्णाचे नाव आहे. तर शुभम आवारे असे उपचार न करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदेश राक्षे यांना मंगळवारी (ता. 05) रस्त्याने जाताना कुत्रा चावला होता. त्यामुळे ते बुधवारी कामाला न जाता उरुळी कांचन येथील सरकारी दवाखान्यात इंजेक्शन घेण्यासाठी सकाळी दहा वाजता गेले होते. दवाखान्यात गेले असता, त्या ठिकाणी ‘रेबीज’ हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे वैद्यकीय अधिकारी शुभम आवारे यांनी राक्षे यांना सांगितले. तसेच बाहेरुन इंजेक्शन घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार उन्हात जाऊन राक्षे यांनी इंजेक्शन व इतर साहित्य घेऊन रुग्णालयात आले व त्यांनी आवारे यांना इंजेक्शन देण्याची विनंती केली. त्यावेळी सदरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आवारे हे ‘इंस्टाग्राम’वर रील्स पाहण्यात दंग होते. त्यानंतर त्यांनी सिस्टर नाहीत, तुम्ही उद्या इंजेक्शन घ्या, असा सल्ला दिला.
राक्षे यांनी खूप विनंती केली, मात्र आवारे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच सिस्टर नसल्याने मी तुला इंजेक्शन देऊ शकत नसल्याचे लेखी दिले. सदरचा प्रकार राक्षे याने उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांना सांगितला.
दरम्यान, सदर ठिकाणी अलंकार कांचन व संतोष कांचन यांनी जाऊन विचारपूस केली असता सदरचे अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत होते. या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अलंकार कांचन यांनी केली आहे. आता या वैद्यकीय अधिकाऱ्यावर वैद्यकीय तालुका अधिकारी काय कारवाई करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.